💐 इयत्ता 3 री शिकलेला,तांदळाच्या सुधारित 9 जाती शोधून काढणारा शेतकरी संशोधक : दादाजी रामजी खोब्रागडे.💐
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड येथे त्याचा जन्म झाला.त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती.घरी जणू अठरा विश्व दारिद्र्य.घरी असणारी दीड एकर शेती कसून तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता. शिक्षण फक्त तिसरी पर्यंत झालेले.एक दिवस भाताच्या शेतात काम करताना पटेल-३या जातीच्या वाणाची एक बारीक दाणे असणारी वेगळी लोंब त्याला दिसली.ही लोंब पाहून यापासून वेगळे भाताचे बियाणे तयार करता येईल असा विचार त्याच्या मनात आला.सुमारे सात वर्षे यावर मेहनत घेऊन त्याने भाताची विक्रमी उत्पादन देणारी एच.एम.टी सोना ही जात शोधली. पुढे तो मुलगा 9 भाताच्या जाती शोधून काढतो.कमी शिक्षण असूनही संशोधकांनाही विचार करायला लागेल असे काम करून दाखवतो. शेतकऱ्याला वरदान ठरणाऱ्या या भाताच्या नवीन जाती शोधणारा तो मुलगा म्हणजे दादाजी रामजी खोब्रागडे.
दादाजी यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या या अद्भुत संशोधनाची दखल घेऊन त्यांना पहिला रिचारिया पुरस्कार जो तांदळाच्या संशोधनासाठी दिला जातो तो प्रदान करण्यात आला.याशिवाय वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार,फोर्ब्ज यादीतील प्रभावशाली व्यक्ती,राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार यासारखे अनेक सन्मान प्राप्त झाले.
एच.एम.टी सोना,नांदेड हिरा,नांदेड चेंनूर, विजय नांदेड, नांदेड 92,डी.आर.के,नांदेड दीपक,काटे एच.एम.टी, डी.आर के- 2 असे नऊ वाण त्यांनी शोधले तेही स्वतः कोणतेही संशोधक नसताना हे विशेष.जिज्ञासा आणि संशोधनासाठी शिक्षण आडवे येत नाही हेच दादाजी यांनी दाखवून दिले.आज भारतातच नाही तर जगभरात एच.एम.टी सोना हे वाण वापरले जाते.आजही कितीतरी लोक केवळ भात खाऊन झोपतात.दादाजी यांनी प्रसंगी स्वतः उपाशी राहून गरिबांच्या भूकमुक्तीचा मार्ग आपल्या संशोधनातून दाखवला.आयुष्याच्या शेवटी त्यांच्या वाट्याला पक्षघाताने आलेले प्रचंड एकाकी पण आले यातच त्यांची जीवनयात्रा संपली.पण जाताना ते लाखो शेतकऱ्याच्या जीवनात आनंद देऊन गेले.त्यांचे जीवन हेच सांगते की तुमचे शिक्षण तुमच्या कल्पक बुद्धिमत्तेच्या आड कधीच येत नाही.हीच कल्पकता तुमचे नाव इतिहासाला राखून ठेवायला भाग पाडते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
😊 संकलन 😊
श्री. भरत पाटील.
No comments:
Post a Comment